पुणे | 08 डिसेंबर 2025
ज्येष्ठ समाजसेवक आणि कष्टकरी चळवळीचे प्रणेते डॉ. बाबा आढाव यांचे आज सायंकाळी 8.25 वाजता पुण्यात निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते; मात्र उपचारांना प्रतिसाद न दिल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आयुष्यभर समाजातील शेवटच्या माणसासाठी लढणारा एक मोठा दीपस्तंभ काळाच्या पडद्याआड गेला आहे.
1936 मध्ये पुण्यात जन्मलेल्या आढाव यांनी आयुष्यातील पहिला संघर्षच समाजातील उपेक्षित घटकांसाठी केला. गरिबांसाठी घरातूनच दवाखाना सुरू करून त्यांनी मोफत उपचारांची सेवा दिली आणि त्यातूनच सामाजिक चळवळींकडे त्यांचे पाऊल वळले.
पुण्यातील हमाल पंचायतीचे नेतृत्व, झोपडपट्टीवासीयांसाठी ‘झोपडी संघ’, आणि धरणग्रस्तांच्या आवाजाला बळ देण्यासाठी सुरू केलेली महाराष्ट्र राज्य धरण-प्रकल्पग्रस्त परिषद ही त्यांच्या सामाजिक कार्याची भक्कम उदाहरणं आहेत.
कामगार, दलित, आदिवासी, वंचितांसाठी आयुष्यभर संघर्ष
संयुक्त महाराष्ट्र चळवळ,गोवा मुक्ती आंदोलन,अन्नभाववाढविरोधी लढा,विषमता निर्मूलन चळवळ,अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील सक्रिय भूमिका
या सर्व चळवळींमध्ये आढाव अग्रभागी राहिले. आणीबाणीच्या काळात त्यांनी १६ महिन्यांचा कारावास भोगला पण विचारांशी तडजोड केली नाही.
महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा जपला
“सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार” – हा महात्मा फुलेंचा विचार आढाव यांनी आयुष्यभर जपला.
सामाजिक कृतज्ञता निधी उभारून त्यांनी अनेक परिवर्तनवादी संस्थांना एकत्र आणले.
नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com