अहिल्यानगर | १७ सप्टेंबर २०२५
बीड–अहिल्यानगर या मार्गावर नवी रेल्वेसेवा बुधवारी सुरू झाली. या ऐतिहासिक क्षणी अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर जिल्हा प्रवासी संघटनेतर्फे रेल्वेचे भव्य स्वागत करण्यात आले. मुख्य चालक अतिक शेख आणि सहाय्यक चालक जितेंद्र बी. यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
या स्वागत सोहळ्यात जिल्हा प्रवासी संघटनेचे हरजीतसिंह वधवा, स्टेशन मास्तर सुधीर महाजन, तसेच अशोक कानडे, अनिल सबलोक, प्रशांत मुनोत, अशोक शिंगवी, संदेश रपारिया, राजू वर्मा, विपुल शाह यांसह मान्यवर उपस्थित होते.
नव्या रेल्वेसेवेच्या सुरुवातीमुळे बीड आणि अहिल्यानगर दरम्यान प्रवास करणाऱ्यांना मोठी सोय उपलब्ध झाली आहे. रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यासह अपघातांचे प्रमाण घटेल, असा विश्वास प्रवासी संघटनेने व्यक्त केला.
हरजीतसिंह वधवा म्हणाले, “बीडकरांची दीर्घकाळाची मागणी पूर्ण झाली आहे. रेल्वेमुळे वेळ, पैसा आणि श्रम वाचतील. विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच रुग्णसेवेसाठी प्रवास करणाऱ्यांसाठी ही सेवा जीवनवाहिनी ठरणार आहे.”