अहिल्यानगर – भिंगार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.ने सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी आपल्या सभासदांना 15 टक्के डिव्हिडंड लाभांश जाहीर केला. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते डिव्हिडंड वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
या वेळी बोलताना आ. कर्डिले म्हणाले की, भिंगार बँकेने नेहमीच व्यावसायिक व छोट्या-मोठ्या उद्योजकांना कर्जवाटप करून आर्थिक उभारी दिली आहे. इतर अनेक बँका कर्जवाटप टाळत असताना भिंगार बँकेने विश्वास ठेवून कर्जवाटप केले, तर सभासदांनी योग्य वेळेत परतफेड केली. त्यामुळेच बँकेचे नाव जिल्ह्यात व राज्यात ठळकपणे टिकून आहे. सर्व निर्णय पारदर्शक पद्धतीने संचालक मंडळाच्या संगनमताने घेतले जातात, हीच बँकेच्या यशाची गुरुकिल्ली आहे, असे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी साईदीप सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. एस. एस. दीपक यांनी सांगितले की, भिंगार बँकेमुळे सभासदांना ठेवी ठेवताना किंवा कर्ज घेताना कोणतीही अडचण भासत नाही. बँकेने निर्माण केलेला विश्वास प्रशंसनीय असून, उपलब्ध योजनांमुळे परिसरातील अनेक छोटे उद्योग मोठ्या प्रमाणावर प्रगती साधत आहेत.
चेअरमन अनिल झोडगे यांनी ज्या सभासदांची खाती बँकेत आहेत त्यांचा डिव्हिडंड त्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचे सांगितले. आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून, सभासद व खातेदारांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तर उपाध्यक्ष किसनराव चौधरी यांनी ज्यांनी अद्याप खाते उघडलेले नाही त्यांनी लवकर खाते उघडून डिव्हिडंड जमा करून घ्यावा, असे सांगितले.
यावेळी ह. भ. प. अमित महाराज धाडगे यांची जिल्हा रुग्णालयातील आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजना समितीवर झालेल्या निवडीबद्दल त्यांचा बँकेच्यावतीने सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात चेअरमन अनिलराव झोडगे, उपाध्यक्ष किसनराव चौधरी, संचालक मंडळाचे सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत महाजन, तसेच अनेक मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक शशिकांत महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन कैलास रासकर यांनी मानले.