ग्रामीण वास्तव उलगडणारी ‘भिताड…गावकुसातली गोष्ट’ कादंबरी प्रकाशित

अहिल्यानगर | 26 फेब्रुवारी 2026

पत्रकार दीपक राजेंद्र कांबळे लिखित ‘भिताड…गावकुसातली गोष्ट’ या कादंबरीचे प्रकाशन शहरातील सी एस आर डी विद्यालय येथील गोल्डन जुबली हॉलमध्ये उत्साहात पार पडले. साहित्यप्रेमी, पत्रकार, शिक्षक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम रंगला.

कार्यक्रमाची सुरुवात वामन दादांच्या ‘आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान’ या गीताने झाली. प्रारंभीच्या सत्रात वक्त्यांनी कादंबरीच्या सामाजिक आशयावर प्रकाश टाकला.

अरुण वाघमोडे म्हणाले, “ही कादंबरी अंधश्रद्धेला थेट छेद देणारी आहे. साधी आणि सोपी भाषा वापरून लेखकाने प्रत्येक पात्राला न्याय दिला आहे. ग्रामीण भागातील व्यथा जशाच्या तशा उभ्या करण्यात ते यशस्वी ठरले आहेत.”

कादंबरीच्या प्रथम वाचक दिपाली तवले यांनी अनुभव सांगताना नमूद केले, “कादंबरी वाचायला सुरुवात केली आणि संपल्याशिवाय खाली ठेवली नाही. ज्वलंत विषयावर लेखकाने मार्मिक भाष्य केले आहे.”

लेखक दीपक कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना बातमी लेखन आणि कादंबरी लेखन यामधील फरक स्पष्ट केला. “कोणी ‘हे तुला जमणार नाही’ म्हटले तरी तेच आपल्याला जमत असते,” असे सांगत त्यांनी लेखनप्रवासातील अनुभव कथन केले. कादंबरीतील पात्रनिर्मितीपासून मुखपृष्ठावरील छायाचित्रापर्यंत विविध बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला. “आईसमोर माझ्या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे, हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे,” असे म्हणताना सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

नितीन पोटलाशेरू यांनी कादंबरी जिवंतपणा निर्माण करणारी असल्याचे सांगितले. रात्रीच्या अंधारातील शांतता आणि सकाळच्या पक्ष्यांचा चिवचिवाट लेखकाने प्रभावीपणे शब्दबद्ध केला आहे, असे त्यांनी नमूद केले. पत्रकार विठ्ठल लांडगे यांनी सर्वांनी ही कादंबरी वाचावी, असे आवाहन केले.

जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा यांनी कादंबरी लेखनासाठी मोठा शब्दसंग्रह आवश्यक असल्याचे सांगत समाजातील अंधश्रद्धांवर भाष्य करणारे लेखन पुढेही सुरू ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. संजय कळमकर यांनी ‘भिताड’ ही रहस्यमय छटा असलेली पण सामाजिक आशयाची कादंबरी असल्याचे नमूद केले. कथा एका ‘भिताडा’भोवती फिरत असून अस्सल ग्रामीण भाषा ही कादंबरीची जमेची बाजू असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. सुरेश पठारे यांनी ही कादंबरी सामाजिक जनजागृतीचे प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. अध्यक्षस्थानावरून बोलताना सुधाकर शेलार यांनी स्पष्ट केले की, ही केवळ गूढकथा नसून सामाजिक आशयावर आधारित कादंबरी आहे. श्रद्धा-अंधश्रद्धा, झटपट श्रीमंत होण्याची मानसिकता आणि त्यातून निर्माण होणारे परिणाम याचे वास्तवदर्शी चित्रण पुस्तकात आढळते, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, माधुरी चोभे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन सूर्यकांत वरकड यांनी केले. प्रास्ताविक महादेव गवळी यांनी केले, तर मान्यवरांचा परिचय प्रा. मेहबूब सय्यद यांनी करून दिला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे अभिनंदन केले.

नविन बातम्यांसाठी 👉

http://Ahilyanagar24live.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!