अहिल्यानगर | ५ जानेवारी २०२६
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ११ मध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संयुक्त पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ उत्साहात पार पडला. झारेकर गल्ली येथील श्री दत्त मंदिरात नारळ वाढवून प्रचाराला औपचारिक सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी भाजपचे उमेदवार विकास वाघ (अ), दीप्ती गांधी (ब), सुभाष लोंढे (ड) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आशा डागवाले (क) यांच्यासह भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिर परिसरात जयघोष करत प्रचाराला सुरुवात करण्यात आली.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रचार सुरू असून, प्रभागात झालेली विकासकामे, उभारण्यात आलेल्या नागरी सुविधा आणि पायाभूत सोयी-सुविधा या मुद्द्यांवर मतदारांशी संवाद साधण्यात येत आहे. विकासाला साथ देत पॅनलच्या चारही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी बोलताना उमेदवार सुभाष लोंढे म्हणाले की, प्रभाग क्रमांक ११ मध्ये माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून, त्यातून अनेक महत्त्वाची विकासकामे मार्गी लागली आहेत. हा विकासाचा प्रवाह अखंड राहण्यासाठी भाजप-राष्ट्रवादी पॅनलला संधी देण्याची गरज आहे. पारदर्शक, स्वच्छ आणि लोकाभिमुख कारभार हेच आमचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तर किशोर डागवले म्हणाले की, “ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठीची आहे. भाजप-राष्ट्रवादी पॅनल म्हणजे विकासाचा विश्वासार्ह पर्याय आहे. नागरिकांना आधुनिक सुविधा देणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.”
नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com