बुऱ्हाणनगरमध्ये तुळजाभवानी पालखीचे पूजन; हजारो भाविकांच्या उपस्थितीत मिरवणूक उत्साहात

अहिल्यानगर (प्रतिनिधी) –

तुळजापूरला विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघनासाठी नेल्या जाणाऱ्या तुळजाभवानी देवीच्या मानाच्या पालखीचे आगमन गुरुवारी बुऱ्हाणनगर येथे झाले. दुपारी १२ वाजता आमदार शिवाजी कर्डीले, युवा नेते अक्षय कर्डीले, संदीप कर्डीले व सरपंच रावसाहेब कर्डीले यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर जयघोष, ढोल-ताशांच्या गजरात व गुलालाच्या उधळणीत पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली.

पालखी मिरवणुकीपूर्वी देवी मंदिरास पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्या. त्यानंतर बुऱ्हाणनगर गावातून पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ग्रामस्थांनी घराघरासमोर रांगोळ्या रेखाटून पालखीचे स्वागत केले. दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. वातावरण भक्तिपूर्ण घोषणांनी दुमदुमून गेले होते. “आई राजा उदो उदो” आणि “सदानंदीचा उदो उदो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.

या वेळी पालखीचे प्रमुख मानकरी व मंदिराचे पुजारी सुदाम जगन्नाथ भगत, ज्ञानेश्वर गोकुळ भगत, शिवराम उत्तम भगत, संतोष मधुकर भगत, देविदास भिमराव भगत, सागर बाळासाहेब भगत, दीपक प्रभाकर भगत, मंगेश शिवाजी भगत, वसंत गणपत भगत, निलेश बद्रीनाथ भगत यांच्यासह भगत परिवारातील सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तिसऱ्या माळेनिमित्त सकाळी भगत परिवाराने देवीची महापूजा केली होती. यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गेल्या हजार वर्षांहून अधिक काळ हा मानाचा वारसा भगत परिवाराकडे आहे. दरवर्षी याच पालखीमधून श्रीक्षेत्र तुळजापूर येथे विजयादशमीला तुळजाभवानी देवीचे सीमोल्लंघन केले जाते.

या वेळी आमदार शिवाजी कर्डीले यांनी पालखीची मिरवणूक ट्रॅक्टरमधून काढून भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली. भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डीले यांनी भाविकांचे स्वागत केले. यात्रेनिमित्त गावात स्वच्छता मोहीम, पिण्याच्या पाण्याची सोय, औषधोपचाराची व्यवस्था करण्यात आली होती. मंदिर परिसरात खाऊगल्ली, खेळणी व सौंदर्यप्रसाधनांची दुकाने उभारण्यात आली असून यात्रेचे स्वरूप जत्रेसारखे गजबजले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!