अहिल्यानगर| प्रतिनिधी
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) सन 2005 पासून कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून जिल्हा रुग्णालयात विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे जिल्हा प्रमुख अभिषेक कळमकर यांनी आज भेट देऊन पाठिंबा दर्शविला.
आंदोलन स्थळी उपस्थित राहून कळमकर यांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रत्यक्ष ऐकले आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी सरकारकडे संतप्त प्रश्न उपस्थित करताना म्हटले की, “१४ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार १० वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समाविष्ट करण्याचा निर्णय झाला होता. मात्र सव्वा वर्षाहून अधिक काळ उलटूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. रात्रंदिवस आरोग्य सेवेच्या आघाडीवर तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या समस्या आजही अनुत्तरित आहेत. सरकारचं लक्ष नेमकं कुठे आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
एनएचएम कर्मचारी मागील दोन दशकांपासून कमी मानधनावर काम करत असून त्यांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. या मागण्यांबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे कळमकर यांनी स्पष्ट केले. “आता विलंब नको, सरकारने तातडीने याबाबत लक्ष घालून निर्णय घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यातील आरोग्यसेवा सुरळीत ठेवण्यासाठी या कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे योगदान असून त्यांचे आंदोलन दीर्घकाळ चालल्यास सार्वजनिक आरोग्य सेवेत गंभीर संकट निर्माण होऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.
Yes Sir