अहिल्यानगर (प्रतिनिधी):
नेवासा तालुक्यातील फत्तेपूर येथील प्रगतशील शेतकरी सोमेश्वर लवांडे यांच्या चारा प्रयोगशाळेला जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कृषी उपसंचालक सागर गायकवाड, नेवासा तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे, मंडळ कृषी अधिकारी शिंदे, आणि कृषी सहाय्यक अमोल साळवे यांनी भेट दिली. अधिकाऱ्यांनी देशी आणि विदेशी पद्धतीने विकसित करण्यात आलेल्या आधुनिक चारा लागवडीच्या विविध प्रयोगांचे अवलोकन करून सविस्तर माहिती घेतली.
सोमेश्वर लवांडे हे गेली नऊ वर्षे चारा उत्पादनातील नवकल्पना आणि प्रयोगशीलतेवर कार्यरत आहेत. त्यांच्या प्रकल्पात थायलंड 4 नेपिअर, सुपर नेपिअर, अमेरिकन 5 केनियन जम्बो तसेच विविध देशी-विदेशी जातींच्या मिश्रणातून उच्च उत्पादनक्षम चाऱ्याची लागवड केली जाते. त्यांच्या या उपक्रमातून महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांना दर्जेदार आणि पौष्टिक चारा उपलब्ध होत आहे.
या भेटीदरम्यान जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे म्हणाले, “सोमेश्वर लवांडे यांचे कार्य हे केवळ चारा उत्पादनापुरते मर्यादित नाही, तर ते ग्रामीण भागातील कृषी-उद्योग संस्कृतीला चालना देणारे आदर्श उदाहरण आहे. त्यांनी देश-विदेशातील विविध जातींचा अभ्यास करून स्थानिक वातावरणाशी जुळणाऱ्या जातींची निवड केली आहे. अशा प्रयोगशीलतेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात आणि दुधाच्या उत्पादनात वाढ झाली आहे. फत्तेपूर पॅटर्न महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.”
सोमेश्वर लवांडे म्हणाले, “मी गेली नऊ वर्षे चारा उत्पादनावर सातत्याने प्रयोग करत आहे. सुरुवातीला काही अपयश आले, पण सातत्य आणि संशोधनामुळे आज माझ्या शेतात देशी-विदेशी प्रकारचे चारा उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये बियाण्यांचा पुरवठा सुरू असून, त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून असलेल्या दूध उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे.”
या भेटीवेळी फत्तेपूर येथील शेतकरी निखिल मुटकुळे, अनंत धुमाळ, ऋषिकेश धुमाळ, अतुल लिमगिरे, वैभव बोरुडे आणि रोहित धुमाळ आदी उपस्थित होते.
हे शेती साठी खूप महत्त्वाचे आहे.