अहिल्यानगर | प्रतिनिधी
येथील बोल्हेगाव, नागापुर प्रभाग क्र. ७ मध्ये गणेश विसर्जनासाठी कृत्रिम व पारंपरिक कुंडाची निर्मिती वेगाने सुरू असून यामुळे गणेश भक्तांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मा. सभापती कुमार वाकळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या माध्यमातून बोल्हेगाव गावठाण जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील जागेवर ही सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.
बोल्हेगाव, गांधीनगर व नागापूर येथील गणेश मंडळांनी विसर्जनासाठी सुरक्षित, सुव्यवस्थित व पर्यावरणपूरक ठिकाणाची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत वाकळे यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला. परिणामी दिनांक ६ सप्टेंबर २०२५, शनिवार रोजी होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी कुंडांचा वापर होणार आहे.
याबाबत स्थानिक ज्येष्ठ नागरिक म्हणाले “आमच्या भागात अशी सोय होणे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. विसर्जन सोहळा आता अधिक सुरक्षित व पर्यावरणपूरक होणार आहे,” तर संघर्ष तरुण मंडळाच्या कार्यकर्त्याने सांगितले, “सभापतींनी वेळेवर पाठपुरावा करून विसर्जनासाठी योग्य सोय उपलब्ध करून दिली, ही आमच्यासाठी मोठी दिलासादायक बाब आहे. ते नेहमीच आमच्या अडचणीत सहकार्य करतात”
या उपक्रमामुळे बोल्हेगाव परिसरात येणारा विसर्जन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार असून, पारंपरिक मूल्यांसह आधुनिक सुविधांचा संगम झाल्याचे चित्र दिसनार आहे.