Ahilyanagar24Live | अहिल्यानगर | Updated: 28 Oct 2025
शहरातल्या गजबजलेल्या सराफ बाजारात तब्बल १ कोटी १ लाख ५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना २६ ऑक्टोबर रोजी घडली असून, याप्रकरणी सहा कारागिरांविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद कृष्णा जगदीश देडगावकर (३२) यांनी दिली असून, त्यांच्या आणि भावाच्या दुकानातील सोन्याचे दागिने कारागिरांनी बनावट कारणे सांगून लंपास केल्याचे उघड झाले आहे.
देडगावकर यांचे “जगदीश लक्ष्मण देडगावकर ज्वेलर्स” आणि प्रतीक देडगावकर यांचे “ए. जे. देडगावकर ज्वेलर्स” अशी दोन दुकाने सराफ बाजारात आहेत. या दुकानांच्या तळ मजल्यावर कारागीर दीपनकर माजी, सोमीन (कार्तिक) बेरा, सत्तू बेरा आणि स्नेहा बेरा काम करत होते, तर सोमनाथ सामंता आणि अन्मेश दुलाई हे विजय जगदाळे यांच्या दुकानात कार्यरत होते. हे सर्व कारागीर सोनारांकडून सोने घेऊन दागिने बनवायचे; मात्र २६ ऑक्टोबर रोजी सर्वजण अचानक गायब झाले.
दुकानमालकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी फोन उचलला नाही. चौकशीअंती हे सर्व कारागीर सोन्याचे दागिने घेऊन पसार झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे कृष्णा देडगावकर यांनी कोतवाली पोलिसांकडे फिर्याद दिली.
फिर्यादीत विविध सोनारांचे २ हजार २१ ग्रॅम वजनाचे दागिने व सोने चोरीस गेल्याचे नमूद करण्यात आले आहे, ज्याची एकूण किंमत ₹१ कोटी १ लाख ५ हजार रुपये इतकी आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिसांनी सराफ बाजारातील सर्व सीसीटीव्ही फुटेज जप्त केली असून, सहा संशयित कारागिरांच्या मोबाईल लोकेशनचा मागोवा घेतला जात आहे. पोलिसांनी या कारागिरांनी पश्चिम बंगाल किंवा ओडिशा राज्यात पलायन केले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला असून, दोन्ही राज्यातील पोलिसांशी संपर्क साधण्यात आला आहे.
याचबरोबर पोलिसांनी सराफ बाजारातील इतर दुकानदारांना कारागिरांची पार्श्वभूमी पडताळून पाहण्याचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे सराफ व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, कारागिरांच्या शोधासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.
नवीन बातम्यांसाठी http://Ahilyanagar24Live.com