मुंबई |प्रतिनिधी १४ सप्टेंबर २०२५
भारत–पाक सामन्याला ठाकरेंचा विरोध.आज दुबईत होणाऱ्या भारत–पाकिस्तान आशिया कप सामन्याला विरोध दर्शवण्यासाठी ठाकरेंची शिवसेना महिला आघाडी “माझं कुंकू, माझा देश” या आंदोलनाची हाक देत आहे. या आंदोलनाअंतर्गत राज्यभर महिला कार्यकर्त्या रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरू असून, सामना खेळवण्यास दिलेल्या परवानगीचा तीव्र निषेध करण्यात येत आहे.
महिला आघाडीच्या नेत्या म्हणाल्या की, पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे उघड झाले असून, अशा परिस्थितीत भारत–पाकिस्तान सामना घेणे म्हणजे शहिदांचा अपमान आहे. त्यामुळे सामना होऊ नये यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादसह राज्यातील विविध शहरांमध्ये “सिंदूर रक्षा अभियान” आणि “सिंदूर के सम्मान में, शिवसेना मैदान में” अशा घोषणांसह महिला आघाडी सज्ज झाली आहे. संध्याकाळी सामन्याच्या वेळेला ठिकठिकाणी आंदोलन रंगणार आहे.
दरम्यान, भारत–पाकिस्तान सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सायंकाळी ६:३० वाजता (भारतीय वेळेनुसार) सुरू होणार असून, चाहत्यांमध्ये सामना पाहण्याबरोबरच या आंदोलनाविषयीही मोठी चर्चा सुरू आहे.