दुबई | वृत्तसंस्था;
हिंदुस्थान चा दणदणीत विजय, पाकडे गारद!भारताचा दमदार विजय, पाकिस्तानला ७ विकेट्सने हरवले.आशिया कप टी–२० क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर ७ विकेट्सने विजय मिळवत दमदार कामगिरीची नोंद केली. रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या रोमांचक सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ९ बाद १२७ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने केवळ तीन गडी गमावून लक्ष्य सहज गाठले.
पाकिस्तानच्या फलंदाजीचा गडगडाट भारताच्या गोलंदाजांनी घडवून आणला. कुलदीप यादवने ३, तर जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. पाकिस्तानकडून शेवटच्या टप्प्यात शहीन आफ्रिदीने १६ चेंडूत ३३ धावा करत थोडा प्रतिकार केला.
भारताच्या डावात सुरुवातीला अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल बाद झाले तरी मधल्या फळीत सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी दमदार भागीदारी करत सामना भारताच्या ताब्यात आणला. सूर्यकुमारने आक्रमक फलंदाजी करत जलद धावा फटकावल्या, तर तिलकने संयमित खेळ दाखवला. अखेरीस भारताने १७व्या षटकातच लक्ष्य गाठून सामना जिंकला.
या विजयामुळे भारताने आशिया कपमधील मोहीम आत्मविश्वासाने पुढे नेली आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मिळालेला विजय भारतीय संघासाठी विशेष महत्त्वाचा ठरला.