इस्रोचा बहूबली अवकाशात,भारताचा सर्वात जड CMS-03 उपग्रह यशस्वीरीत्या लॉन्च

Ahilyanagar24Live | अहिल्यानगर  3 नोव्हेंबर 2025

भारताने अवकाश संशोधन क्षेत्रात पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे! इस्रोने काल (२ नोव्हेंबर २०२५) देशातील सर्वात जड उपग्रह CMS-03 (ओळख: GSAT-7R) अवकाशात यशस्वीरीत्या सोडून जगासमोर भारतीय तंत्रज्ञानाची ताकद दाखवून दिली आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून ‘बहूबली’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या LVM3-M5 रॉकेटच्या साहाय्याने या उपग्रहाला भूस्थिर स्थानांतरण कक्षेत (GTO) पाठवण्यात आले. हा संचार उपग्रह भारतीय नौदलाच्या अत्याधुनिक संपर्क प्रणालीसाठी गेमचेंजर ठरणार आहे.

या CMS-03 उपग्रहाचे वजन तब्बल ४,४१० किलो असून, हा भारतातून आतापर्यंत सोडलेला सर्वाधिक वजनाचा संचार उपग्रह आहे. विशेष म्हणजे हा उपग्रह भारतीय नौदलाच्या जहाजांमधील, तळांमधील आणि आंतरराष्ट्रीय समुद्र क्षेत्रातील संवाद अधिक सुरक्षित, वेगवान आणि अचूक करण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे. यामुळे भारतीय नौदलाची कार्यक्षमता व देखरेख क्षमता आणखी वाढणार आहे.

इस्रोच्या LVM3-M5 रॉकेटने रविवारी दुपारी 5:30 वाजता उड्डाण घेतले आणि काही मिनिटांतच उपग्रहाला ठरलेल्या कक्षेत सोडण्यात आले. अवघ्या काही क्षणांत सतीश धवन केंद्रावर उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. इस्रोच्या वैज्ञानिकांनी यशस्वी लॉंचनंतर सांगितले की, “हा उपग्रह भारताच्या स्वावलंबी अवकाश शक्तीचा आणखी एक टप्पा आहे.”

ही कामगिरी भारतासाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे कारण ती देशाच्या ‘Make in India – Space Power’ संकल्पनेला नवे बळ देणार आहे. अवकाश संशोधन, संरक्षण आणि संचार या तीनही क्षेत्रांमध्ये हा टप्पा अभिमानास्पद ठरला आहे.

 

नवीन बातम्यांसाठी 👉 http://ahilyanagar24live.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!