जामखेड |प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील चोंडी येथील अजित उबाळे चापडगाव रोडवर हातात गावठी कट्टा घेवून फिरत होता अशी माहिती जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यांनी नेमलेले पथक चोंडी गावात शोध घेत असतांना अजित लालासाहेब उबाळे हा चौंडी ते चापडगाव जाणारे रोडवर सिना नदीच्या पुलाजवळ दिसला. पथकास पाहुन नदीच्या किनारी असलेल्या काटेरी झाडात पळुन गेला होता.
दि.02 सप्टेंबर रोजी अजित उबाळे विरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचा शोध घेत असताना तो पाटोदा गावाच्या शिवारात येणार असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाल्याने सहायक पोलिस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, देविदास पळसे, कुलदिप घोळवे यांनी सापळा रचून आरोपी अजित उबाळे यास त्याचे जवळील गावठी कटटयासह ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, नंदकुमार सोनवलकर, देविदास पळसे, कुलदिप घोळवे तसेच दक्षिण विभाग मोबाईल सेलचे नितीन शिंदे यांनी केली आहे.