जिल्हाधिकारी निवास प्रवेशद्वार चिखलमय; महापालिका प्रशासकाच्या दुर्लक्षामुळे साथीच्या रोगांचा धोका

अहिल्यानगर | प्रतिनिधी

महानगरपालिकेच्या प्रशासकीय दुर्लक्षामुळे जिल्हाधिकारी निवासाच्या प्रवेशद्वाराची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. स्टेशनरोडच्या दक्षिणेकडील प्रवेशद्वारासमोर खड्डे, चिखल, माती, कचरा व साचलेल्या पाण्यामुळे परिसर चिखलमय झाला असून जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हे निवासस्थानच जणू एखाद्या दुर्गम भागातील रस्त्यासारखे वाटू लागले आहे.

नुकत्याच झालेल्या पावसामुळे येथे पाणी साचून चिखलाचा राडारोडा तयार झाला आहे. स्वच्छता व जलनिस्सारणाचा कोणताही ठोस उपाय न झाल्याने डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. कलेक्टरसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही या अस्वच्छतेतून मार्ग काढत निवासात जावे लागत असल्याने परिस्थिती किती गंभीर आहे हे स्पष्ट होते.

शहराच्या मध्यवर्ती भागातील जिल्हाधिकारी निवासासमोरच अशी स्थिती असेल, तर इतर भागातील परिस्थिती कशी असेल याची सहज कल्पना येते. नागरिकांचा रोष वाढण्याआधीच रस्ता दुरुस्ती, पाणी काढणी व स्वच्छतेची कामे तातडीने हाती घेण्याची मागणी होत आहे.

सध्या अहिल्यानगर शहरात सर्वत्र कचऱ्याचे उकीरडे, डुक्करे, भटके कुत्रे व बेवारस जनावरे यांचा सुळसुळाट झाला आहे. डिएसपी चौक ते कोठला स्टँड या मार्गावर मोठ्या प्रमाणत  भटक्या कुत्र्यांचे टोळके फिरताना दिसतात. या मार्गावरून शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिक पायी ये-जा करत असल्याने त्यांच्यावर मोठा धोका निर्माण झाला आहे.

अस्वच्छतेमुळे रोगराई पसरून नागरिकांच्या आरोग्यावर घाला येऊ नये म्हणून महापालिकेने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. शहर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवणे ही काळाची गरज आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!