नगर | प्रतिनिधी :
दिवाळी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कापड बाजार, सराफ बाजार आणि दाळ मंडई परिसरात होणारे शनिवारचे लोडशेडिंग तात्काळ थांबवावे, अशी मागणी कापड बाजार व्यापारी असोसिएशनच्या वतीने अधीक्षक अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
नगर शहरातील या प्रमुख व्यापारी पेठांमध्ये जिल्हाभरातून नागरिक खरेदीसाठी येतात. मागील शनिवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत झालेल्या लोडशेडिंगमुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले तर ग्राहकांनाही मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.या निवेदनात नमूद करण्यात आले की, महावितरण दर शनिवारी देखभाल कामासाठी वीजपुरवठा बंद ठेवते. मात्र शनिवार व रविवार या दोन दिवसांतच व्यापाराची सर्वाधिक उलाढाल होत असल्याने त्या काळातील लोडशेडिंग थांबविण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. आठवड्यातील इतर कोणत्याही दिवशी देखभाल करण्यास हरकत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.सणासुदीच्या काळात लोडशेडिंगमुळे व्यापाऱ्यांबरोबरच बांधकाम क्षेत्रातील कामगार, तंत्रज्ञ आणि विद्यार्थ्यांनाही मोठा फटका बसत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यामुळे शहराच्या अर्थचक्रावर परिणाम होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.अधीक्षक अभियंता यांनी व्यापाऱ्यांना सणासुदीच्या काळात शनिवारचा लोडशेडिंग कार्यक्रम रद्द करून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे आश्वासन दिले.
या वेळी विकी वाघ, किरण वरा, भागचंद रायसिंगानी, देवेंद्र बठेजा, रुपेश नहाटा, विशाख वैद्य, संभव काठेड, आदित्य गांधी, आनंद मुथा व विजय भंडारी उपस्थित होते.
कापड बाजार ही नगर जिल्ह्यातील प्रमुख व्यापारी पेठ असून सणासुदीच्या काळात येथे मोठी ग्राहक गर्दी असते. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी असोसिएशनने महावितरण कार्यालयाला निवेदन दिले असून शनिवारचे लोडशेडिंग बंद करण्याची मागणी करण्यात आली असल्याची माहिती विकी वाघ यांनी दिली.