केडगाव-देवी रोडवरील अथर्व नगरचा एल्गार; ‘सुविधा द्या नाहीतर मतदानावर बहिष्कार!’

अहिल्यानगर । प्रतिनिधी – महापालिकेचे कर नियमित भरूनही मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या केडगाव देवी रोड परिसरातील अथर्व नगर आणि ठुबे मळा येथील नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. मागील १० वर्षांपासून रस्ते, पाणीपुरवठा आणि ड्रेनेज यांसारख्या अत्यावश्यक नागरी समस्यांकडे महापालिकेने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, नागरिकांनी मंगळवारी (दि. ३० सप्टेंबर) उपायुक्त विजयकुमार मुंडे यांना धारेवर धरले.

ठिय्या आणि बहिष्काराचा इशारा

महापालिका प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आता थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यांनी प्रशासनाला आठ दिवसांची अंतिम मुदत दिली आहे. या मुदतीत समस्या न सुटल्यास आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन छेडले जाईल, तसेच प्रश्न न सुटल्यास येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला.

ड्रेनेज आणि आरोग्याचा धोका

२००९-२०१० साली वसवलेल्या अथर्व नगरमध्ये सुमारे दीडशे ते दोनशे कुटुंबे राहतात. वसाहतीत ड्रेनेज लाईनची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे घरांचे सांडपाणी आणि पावसाचे पाणी रस्त्यांवर साचून मोठे दूषित डबके तयार झाले आहेत. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे, ज्यामुळे नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे.

अपुरा पाणीपुरवठा आणि रखडलेला रस्ता

जुनी दोन ते अडीच इंची लाईन वापरली जात असल्याने पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे, जो वाढलेल्या लोकसंख्येसाठी अपुरा आहे. नागरिकांनी तातडीने ४ इंची नवी लाईन टाकून देण्याची मागणी केली आहे. याशिवाय, भागातील रस्ता दोन वेळा मंजूर होऊनही स्थानिक व्यक्तींच्या वादामुळे तो रखडला आहे. त्यामुळे नागरिकांना दररोज चिखल, खड्डे आणि धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.

यावेळी दिलीप दुधवणे, अविका पुंडे, मकरंद जोशी, विठ्ठल गारुडकर, शेषराव तांबडे, सोनवणे, मेजर सुरेश आंधळे, सतीश सूर्यवंशी, नितीन घोडके, तेजस बिचकर, भुजबळ मामा, समीर कुलकर्णी, दत्ता कुलकर्णी, ओंकार तागडे, ऋग्वेद दंडवते, दिलीप भोसले, संदीप मराठे, ताराचंद केवट, बाजीराम गर्जे, अनिकेत साळी, विजय बडवे यांसह मंजुषा पाठक, मनिषा तांबोळी, सोनाली कुलकर्णी, अबोली जोशी, वैशाली पुंडे, घोडके, दूधवणे, उषा तांबडे, गर्जे, पद्मा तांबे, प्रिती दंडवते, प्रमिला कानफाडे, कविता बिचकर, भागडे, रेखा पावसे आदी मोठ्या संख्येने नागरिक आणि महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!