अहिल्यानगर | दिनांक 31 डिसेंबर 2025
केडगाव येथील ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्या नेतृत्वाखालील कोतकर गटाने महापालिका निवडणुकीतून अचानक माघार घेतल्याने नगर शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात हा निर्णय घेण्यात आल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून, या माघारीमागचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.
केडगावमधील दोन्ही प्रभागांतून कोतकर गटाकडून ताकदीने निवडणूक लढवण्याची तयारी सुरू होती. सुरुवातीला भाजपकडे उमेदवारीसाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानंतर कोतकर यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेशी संपर्क साधत उमेदवारीबाबत चर्चा केली होती. काही जागांवर उमेदवारी देण्याबाबत अंतिम टप्प्यापर्यंत हालचाली सुरू होत्या आणि इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्जही दाखल केले होते.
मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच कोतकर गटाने निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली. या निर्णयामुळे शिंदे गटाच्या शिवसेनेलाही मोठा धक्का बसला असून, इच्छुक उमेदवार व समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. अनेक उमेदवारांना या निर्णयाची पूर्वकल्पना नसल्याने केडगाव परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, भानुदास कोतकर यांनी ३० डिसेंबर रोजी सकाळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. या भेटीत निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जाते. या चर्चेनंतरच कोतकर गटाने निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात असले, तरी माघारीमागचे नेमके राजकीय गणित अद्याप गुलदस्त्यात आहे.
कोतकर गटाच्या या अनपेक्षित निर्णयामुळे केडगावमधील निवडणुकीचे संपूर्ण चित्र बदलले असून, येत्या काळात या घडामोडींचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com