अहिल्यानगर| प्रतिनिधी
येथील शिवसेना (ठाकरे गट) शहरप्रमुख किरण काळे यांना अखेर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. शहरातील तब्बल ४०० कोटींच्या रस्ते घोटाळ्याचा आरोप त्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यावर केला होता. या आरोपानंतर घडलेल्या घटनाक्रमामुळे नगरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते की, लोकप्रतिनिधींच्या सहभागाशिवाय एवढा मोठा भ्रष्टाचार शक्यच नाही. खासदार संजय राऊत यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती. मात्र या मागणीनंतर काही तासांतच काळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यामुळे हा गुन्हा केवळ राजकीय वादातून तर नाही ना? असा सवाल नागरिकांमध्ये चर्चेत आहे.
आधीही असा अनुभव काळे यांना आला होता. एमआयडीसीतील आयटी पार्क प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र, न्यायालयात तो आरोप फोल ठरला. यावेळी मात्र त्यांच्यावर थेट बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
किरण काळे काँग्रेसमधून काही महिन्यांपूर्वीच शिवसेना (ठाकरे गटात) दाखल झाले होते. त्यांनी घोटाळ्याचा मुद्दा सातत्याने लावून धरल्यानंतरच त्यांच्या विरोधात गंभीर गुन्हे नोंदवले जात असल्याचे पाहून नगरकरांमध्ये चर्चा रंगली आहे.
नगरमधील सत्ताधारी राजकारणाचा पॅटर्नच वेगळा आहे का? भ्रष्टाचारावर प्रश्न विचारला तरच समोरच्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं का? असा सवाल आता जनतेतून विचारला जात आहे.