लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर हल्ला; तीन संशयित ताब्यात, चौकशी सुरू

अहिल्यानगर | प्रतिनिधी

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर आज शनिवार, २७ सप्टेंबर रोजी सकाळी अरणगाव बाह्यवळण रस्त्यावर अज्ञात तरुणांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात हाके यांच्या कारचे मोठे नुकसान झाले असून गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. मात्र सुदैवाने त्यांना शारीरिक इजा झालेली नाही.

हाके दैत्यनांदूर (ता. पाथर्डी) येथे आयोजित ओबीसी एल्गार सभेसाठी जात असताना हा प्रकार घडला. ते नाश्त्यासाठी थांबून पुन्हा प्रवासास निघाले असता काही अज्ञातांनी वाहन अडवून काठ्यांनी हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.

दरम्यान, हाके यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत ओबीसी समाजाच्या एकतेची गरज अधोरेखित केली असून उद्या दैत्यनांदूर मेळाव्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे जाहीर केले.

या घटनेमुळे ओबीसी आरक्षण चळवळीतील तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, अहमदनगर येथील गोरख दळवी, संभाजी सप्रे व गणेश होळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!