अहिल्यानगर | प्रतिनिधी
नगर तालुक्यातील बिबट्याची दहशत अक्षरशः थैमान घालत आहे. खारेकर्जुने (Karjune Khare) येथे दोन दिवसांपूर्वी सहा वर्षांच्या रियांका पवारवर हल्ला करून तिला ठार करणारा बिबट्या आज पुन्हा सक्रिय झाला आहे. यावेळी इसळक येथील कोतकर वस्तीवर 8 वर्षांच्या राजवीर रामकिसन कोतकर या मुलावर हल्ला झाला असून, तो गंभीर जखमी झाला आहे.
तालुक्यात बिबट्याची दहशत गेल्या काही दिवसांपासून वाढतच चालली आहे. खारेकर्जुने, निंबळक, इसळक, हिंगणगाव, जोगेश्वरी मळा हे सगळेच परिसर आता हॉटस्पॉट बनले असून जवळपास रोजच बिबट्याच्या हालचाली व हल्ल्यांच्या बातम्या समोर येत आहेत.
दोन दिवसांपूर्वीची दुर्दैवी घटना
बुधवारी संध्याकाळी खारेकर्जुने येथे रियांका सुनील पवार (वय 6) हिला खेळत असताना बिबट्याने अक्षरशः उचलून नेले. तब्बल 16 तासांच्या शोधानंतर तिचा मृतदेह सापडला होता. या घटनेनंतर खारेकर्जुने ग्रामस्थांनी गुरुवारी गावबंद पाळून नरभक्षक बिबट्याला तातडीने पकडावे अशी जोरदार मागणी प्रशासनासमोर केली.
आज पुन्हा हल्ला — 8 वर्षांचा राजवीर कोतकर जखमी
ही भीषण घटना ताजी असतानाच शुक्रवारी सायंकाळी इसळक येथील वैष्णव माता मंदिर परिसरातील कोतकर वस्तीवर राजवीर रामकिसन कोतकर (वय 8) हा मुलगा खेळत असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप घातली.
नशिब बलवत्तर म्हणून राजवीर बिबट्याच्या तावडीतून सुटला तरी त्याच्या अंगावर तीव्र जखमा आहेत. त्याला तातडीने अहिल्यानगरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.
ही घटना घडताच कोतकर वस्ती, इसळक, निंबळक व आसपासच्या गावांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तोच बिबट्या असल्याचा संशय
खारेकर्जुनेतील रियांका पवार प्रकरण आणि आजची इसळक येथील घटना यामध्ये अनेक साम्ये दिसून येत असल्याने ग्रामस्थ व स्थानिक सांगत आहेत की—
➡️ “हा त्याच नरभक्षक बिबट्याचा प्रहार आहे.”
➡️ “तो गेल्या काही दिवसांत निंबळक-खारेकर्जुने-इसळक हा पट्टा सतत फिरत आहे.”
“नरभक्षक बिबट्याला तातडीने ठार मारावा, अन्यथा आणखी मुलांचे जीव धोक्यात येतील.” अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या डॉ. दिलीप पवार यांनी दिली.
फॉरेस्ट विभागावर प्रश्नचिन्ह
गेल्या अनेक घटनांनंतरही बिबट्याला पकडता आलेले नाही. गावकऱ्यांच्या मते वनविभागाकडून गंभीर दुर्लक्ष होत आहे. गावांमध्ये रात्री संचारबंदी सारखे वातावरण निर्माण झाले असून पालक मुलांना बाहेर सोडताना घाबरत आहेत.
नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com
