मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील मुंबई, अहिल्यानगार सह २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला असून, त्यासोबतच संपूर्ण राज्यात आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या सर्व महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
निवडणूक कार्यक्रमानुसार २३ ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ३१ डिसेंबर रोजी अर्जांची छाननी होईल. त्यानंतर २ जानेवारी २०२६ पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत असून, ३ जानेवारीला अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
१५ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, १६ जानेवारीला मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
महापालिका निवडणुकांची घोषणा होताच राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्ष तयारीला लागले असून, अनेक ठिकाणी संभाव्य उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार सुरू केल्याचे चित्र दिसत आहे. काही ठिकाणी उमेदवारांकडून थेट मतदारांच्या दारात भेटीगाठी आणि प्रचार सुरू झाल्याचीही चर्चा आहे.
आचारसंहिता लागू झाल्यामुळे राज्यातील सर्व सरकारी विभाग, अधिकारी व प्रशासनावर निवडणूक आयोगाचे निर्बंध तत्काळ लागू झाले असून, कोणतेही नवीन निर्णय, घोषणा किंवा निधीवाटपासाठी आयोगाची परवानगी आवश्यक असणार आहे.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज दाखल : २३ ते ३० डिसेंबर २०२५
अर्ज छाननी : ३१ डिसेंबर २०२५
अर्ज माघार : २ जानेवारी २०२६
अंतिम यादी : ३ जानेवारी २०२६
मतदान : १५ जानेवारी २०२६
निकाल : १६ जा
जानेवारी २०२६
नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com