अहिल्यानगर (प्रतिनिधी)
हवामान खात्याने राज्यात पुढील तीन दिवसांसाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर अचानक वाढलेल्या ढगाळ वातावरणामुळे तापमानातही किंचित घट जाणवते आहे.
मौसम विभागाच्या मते, समुद्रावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या पश्चिम भागात ढगांचे प्रमाण वाढले असून, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, नाशिक आणि आहिल्यानगर या जिल्ह्यांतही विजांसह हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे.
आहिल्यानगर शहरात आज आकाश पूर्णपणे ढगाळ असून, काही भागात रिमझिम पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारपासून रविवारीपर्यंत सकाळी आणि संध्याकाळी हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या काळात शहरातील किमान तापमान २० अंश सेल्सियस तर कमाल तापमान २८ अंशांच्या दरम्यान राहणार आहे.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना सध्या सुरू असलेल्या रब्बी पिकांच्या तयारीदरम्यान पाऊस लक्षात घेऊन योग्य नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांनी बाहेर पडताना छत्री आणि आवश्यक खबरदारी बाळगण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.