अहिल्यानगर (प्रतिनिधी) –
दिवाळीचा सण म्हणजे प्रकाश, आनंद आणि एकत्रिततेचा प्रतीक. मात्र, काहीजण आजारपणामुळे रुग्णालयाच्या बेडवर असल्याने हा सण अनुभवू शकत नाहीत. या भावनेला ओळखून आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हा रुग्णालयात माणुसकीची दिवाळी साजरी करण्यात आली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना फराळ वाटप करून सणाचा आनंद वाटण्यात आला.
भरत खाकाळ म्हणाले, “आनंदात असलेल्या लोकांपर्यंत सर्वजण पोहोचतात, पण दुःखात आणि आजारपणात असलेल्यांपर्यंत जाऊन सण साजरा करणे ही खरी माणुसकी आहे. प्रकाशाच्या या सणात दुःखात असणाऱ्यांच्या जीवनात थोडा उजेड पसरवणे हीच खरी दिवाळी आहे.”
या उपक्रमादरम्यान कार्यकर्त्यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. फराळात चकली, लाडू, करंजी, शेव यांसारख्या पदार्थांचे वाटप करण्यात आले. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी ‘आप’च्या या माणुसकीच्या उपक्रमाचे कौतुक केले.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ, महिला अध्यक्ष अँड. विद्या शिंदे, महासचिव दिलीप घुले, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या सचिव कावेरी ताई भिंगारदिवे, युवा आघाडीचे उपाध्यक्ष पत्रकार विजय लोंढे, ओम संतोष भिंगारदिवे, सोहम संतोष भिंगारदिवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील पाहणीदरम्यान पदाधिकाऱ्यांनी एमआरआय मशीनच्या अभावाबद्दल चिंता व्यक्त केली. भरत खाकाळ यांनी सांगितले की, “रुग्णांना महागड्या खाजगी तपासण्या कराव्या लागतात, त्यामुळे जिल्हा रुग्णालयात एमआरआयची सोय तातडीने व्हावी.” त्यांनी पुढील काही दिवसांत जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाला निवेदन देण्याचा संकल्प व्यक्त केला.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडी व ताजे अपडेट्स वाचण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा
👉 https://ahilyanagar24live.com/