अहिल्यानगर | प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या समारोपावेळी मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनानुसार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील 2024 मधील आंदोलनांदरम्यान दाखल झालेल्या ११ गुन्ह्यांना जिल्हास्तरावरील त्रिसदस्यीय समितीने मागे घेण्यास पात्र ठरवले असून, त्यांची पुढील न्यायालयीन प्रक्रिया पोलिसांमार्फत सुरू करण्यात आली आहे.
या गुन्ह्यांमध्ये कोपरगाव, नगर एमआयडीसी, भिंगार कॅम्प, श्रीगोंदा, कोतवाली, शेवगाव आणि श्रीरामपूर पोलिस ठाण्यांतील गुन्ह्यांचा समावेश आहे. उर्वरित गुन्ह्यांबाबत तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
हैदराबाद गॅझेटमधील नोंदीनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी मुंबईत पाच दिवस उपोषण केले होते. त्यानंतर सरकारने निर्णय घेत कुणबी प्रमाणपत्र वितरणास मान्यता दिली. या आंदोलनादरम्यान दाखल गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले होते. त्यानुसार त्रिसदस्यीय समिती स्थापन करून गुन्ह्यांची तपासणी करण्यात आली.
मागे घेण्यास पात्र ठरलेले गुन्हे:
-
श्रीरामपूर तालुका पोलिस ठाणे (क्रमांक 85/2024)
-
कोपरगाव शहर पोलिस ठाणे (84/2024)
-
कोपरगाव तालुका पोलिस ठाणे (52/2024)
-
भिंगार कॅम्प पोलिस ठाणे (171/2024 व 172/2024)
-
कोतवाली पोलिस ठाणे (213/2024)
-
एमआयडीसी पोलिस ठाणे (171/2024 व 172/2024)
-
श्रीगोंदा पोलिस ठाणे (215/2024 व 216/2024)
-
शेवगाव पोलिस ठाणे (155/2024)
या गुन्ह्यांमध्ये कलम 341, 143, 188 तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 37(1) 135 आदी कलमांन्वये कारवाई झाली होती.
अहिल्यानगर सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने अलीकडेच जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. जिल्हा पोलिस अधीक्षक घार्गे यांनी सांगितले की, त्रिसदस्यीय समितीमार्फत तपासणी सुरू असून, ११ गुन्ह्यांची माघारी प्रक्रिया सुरु आहे, तर उर्वरित गुन्ह्यांबाबत चौकशी चालू आहे.
या कार्यवाहीबद्दल समाजाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शिष्टमंडळात अॅड. अनुराधा येवले, अॅड. गजेंद्र दांगट, अॅड. हरीश भामरे, मदन आढाव, वैभव भोगाडे, स्वप्निल दगडे, अभय शेडगे, निलेश सुबे, राम जरांगे, संदीप जगताप, प्रमोद कोरडे, सिद्धांत पानसरे, भारत भोसले, रमेश मुंगसे, सागर भोसले, जगन्नाथ निमसे, सोमनाथ गुंड, राम सातपुते यांचा सहभाग होता.