संगमनेर (प्रतिनिधी) – शहरातील मालपाणी लॉन्स येथे सार्वजनिक कार्यक्रमानंतर आमदार अमोल खताळ हे बाहेर पडत असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना गुरुवारी (दि. 28) रात्री घडली. यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. यामुळे पोलिसांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.
आमदार खताळ हे मालपाणी लॉन्स येथील कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रमानंतर ते बाहेर पडत असताना एका तरुणाने हस्तांदोलन करण्याच्या बहाण्याने त्यांच्यावर हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांसह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
हल्ल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे. हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. तर आमदार खताळ यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी हल्ला करणाऱ्याला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई करत आहेत.