अहिल्यानगर | १७ सप्टेंबर २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त जैन श्वेतांबर तेरापंथी उपसभा आणि अखिल भारतीय तेरापंथ युवा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर शहरात ‘रक्तदान अमृत महोत्सव २.०’ अंतर्गत मेगा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात नगरकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सेवाभावी भावनेचे दर्शन घडवले.
या शिबिराचे मुख्य आयोजन भाजपा जैन प्रकोष्ठ सेलचे राज्य सचिव व केंद्रीय मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य सुदर्शन डुंगरवाल आणि प्रकाश बच्छावत यांनी केले. आनंदऋषी हॉस्पिटल रक्तपेढी, जनकल्याण रक्तपेढी, हेल्पिंग हँड्स फॉर हंगर्स संस्था, व्यापारी संघटना तसेच भाजप शहर जिल्हा सर्व सेल आणि इतर सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप व भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक, व्यावसायिक, भाजप पदाधिकारी, पोलिस अधिकारी तसेच विविध संस्था आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले, “मोदीजींनी देशाला नवा आत्मविश्वास दिला असून अखंड भारताच्या संकल्पनेला ते मूर्त रूप देऊ शकतात. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत विश्वगुरु बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.”
भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी सांगितले, “मोदीजींचा वाढदिवस रक्तदानासारख्या समाजोपयोगी उपक्रमाने साजरा होणे म्हणजे खरी देशसेवा आहे. युवकांचा मोठा सहभाग विशेष उल्लेखनीय असून यामुळे समाजात दानशक्ती आणि राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होईल.”
सुदर्शन डुंगरवाल यांनी सांगितले की, “सेवा हीच संघटना हा मोदीजींचा संदेश आजच्या रक्तदान शिबिरातून प्रत्यक्षात उतरला आहे. या रक्तदानातून अनेक रुग्णांचे जीव वाचतील, हेच खरी जीवनदानाची क्रांती आहे.”
आर. जे. चैत्राली जावळे यांनी सूत्रसंचालन केले तर मीनाताई मुनोत यांनी आभार मानले.