अहिल्यानगर | दिनांक : 31 डिसेंबर 2025
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) मध्ये मोठी शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिंदे गटाच्या दोन पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून, या निर्णयामुळे शहराच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
हकालपट्टी करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आकाश कातोरे आणि शहर प्रमुख महेश लोंढे यांचा समावेश आहे. महापालिका निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केल्याने तसेच पक्षशिस्त मोडल्याने ही कठोर कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

ही कारवाई पक्षाच्या अधिकृत आदेशानुसार करण्यात आली असून, याबाबतची माहिती शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. पक्षशिस्तीशी तडजोड केली जाणार नाही, असा थेट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
दरम्यान, येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून तब्बल ५४ जागांवर उमेदवार देण्यात आले असून, शहरातील विविध प्रभागांमधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. सर्व प्रभागांमध्ये ताकदीने निवडणूक लढवण्याची तयारी पक्षाने केली असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
या हकालपट्टीच्या कारवाईमुळे शिंदे गटातील अंतर्गत घडामोडींना वेग आला असून, याचे आगामी निवडणुकीवर काय परिणाम होतील, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.
नविन बातम्यांसाठी 👉http://Ahilyanagar24live.com