अहिल्यानगर | १६ नोव्हेंबर २०२५
नगर–मनमाड रोडवरील नागापूर गावठाण परिसरात महापालिकेच्या मालकीच्या रस्त्यावर एका बेकायदेशीर पत्रा शेडचे सात–आठ महिन्यांपासून अतिक्रमण सुरू आहे. या पत्रा शेडमुळे रस्त्याची रुंदी मोठ्या प्रमाणावर कमी झाली असून, दोन वाहनांना बाजूने जाण्यासही अडचण येत आहे. परिणामी सकाळ–संध्याकाळ वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे.
स्थानिक रहिवाशांनी केलेल्या आरोपानुसार, दिनेश छाबरिया यांनी रस्त्याच्याच कडेला पत्रा शेड उभारून ते भाड्याने दिले आहे. या ठिकाणी व्यापारी क्रियाकलाप सुरू असल्याने वाहनांची धावपळ वाढते आणि पादचारी व नागरिकांसाठी सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नागरिकांनी सातत्याने तक्रारी करूनही महापालिकेचा अतिक्रमण विभाग केवळ वरवरची, थातूरमातूर कारवाई करतो, असा आरोप करण्यात आला. शेड काढण्याऐवजी उलट त्याला सुरू ठेवण्यासाठी संगनमत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला.
रहिवाशांपैकी अशोक सप्रे, रमेश सप्रे, संपत सप्रे, सचिन कोतकर, किरण सप्रे, विलास सप्रे यांनी सांगितले की,
“महापालिकेच्या मालकीच्या रस्त्यावर उभारलेले पत्रा शेड तात्काळ काढले नाही, तर पुढील १० दिवसांत आम्ही कोणतीही पूर्वसूचना न देता महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर उपोषणाला बसणार आहोत.”

नागरिकांच्या आरोपानुसार, हे अतिक्रमण कायम राहिल्यास वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि सार्वजनिक जागेवरचा बेकायदेशीर ताबा — हे सर्व प्रश्न अधिक गंभीर होतील. त्यामुळे प्रशासनाने त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
“आम्ही सात–आठ महिने तक्रारी करूनही काहीच होत नाही. प्रशासनानं अतिक्रमण तात्काळ हटवावं. नाही तर आम्ही उपोषणाला बसणार.”
— स्थानिक नागरिक
नविन बातम्यांसाठी 👉 http://ahilyanagar24live.com
छोट्या छोट्या व्यापाऱ्याची अतिक्रमण सहज दिसून येते, मग ते कोणत्याही वाह्तुकिला अडथळा असो व नसो कारण कोणी मोठ्या व्यापाऱ्याची त्यावर नजर गेलेली असते, कारण हे छोटे व्यापारी संपवून या मोठ्या व्यापाऱ्याला स्वत:चा व्यापार मोठा करायचा असतो. आणि त्यांची दुकाने वाहतुकीस अडथळा सांगून पध्दतशीर हटवली जातात. नगर मध्ये अशी भरपूर मोठी अतिक्रमणे आहे. सावेडीच्या बुलट शोरूम पासून तर थेट डी एस पी चौकापर्यंत अतिक्रमण आहे सर्व हॉस्पिटल, मोल्स, हॉटेल्स यांच्या पार्किंग तर रोडवरच आहेत. दुपदरी रोड असतांनाही हि येथे एखाद्या गल्ली बोळातून चालल्यासारखे वाटते त्याबद्दल तुम्ही कोणी बोलत नाही, आंदोलन तर करा हो पण या सर्व शोरूम्स, हॉस्पिटल, मोल्स, हॉटेल्स यांच्या पार्किंग मुळे वाहतुकीला होणारा अडथळ्यांचा मुद्दा त्या आंदोलनात विसरू नका म्हणजे झाले. अन्ही खरे बोलले म्हणून कुणाला झोंबू नये. म्हणजे झाले.