अहिल्यानगर | २ जानेवारी
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण चांगलेच तापले असून बिनविरोध निवडींमुळे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप यांच्यात थेट संघर्ष रंगताना दिसत आहे.
काल अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कुमार वाकळे आणि प्रकाश भागनगरे हे दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याने दिवसभर नगरच्या राजकीय वर्तुळात या नावांची जोरदार चर्चा होती. राष्ट्रवादीने काल खाते उघडत आघाडी घेतली होती.
मात्र आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने जोरदार मुसंडी मारली. दुपारी तीन वाजण्यापूर्वी प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाले. यामध्ये प्रभाग ६ ड मधून करण कराळे, प्रभाग ६ ब मधून सोनाबाई शिंदे, तर प्रभाग ७ मधून पुष्पा अनिल बोरुडे यांचा समावेश आहे. त्यामुळे आजचा दिवस भाजपसाठी यशस्वी ठरल्याचे चित्र आहे.
आज उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शहरात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या. प्रभाग १६ ड (केडगाव) येथून संदीप बन्सी कराळे, प्रभाग १७ अ मधून अक्षता डांगे, प्रभाग १० अ मधून गौरव अरुण ढोणे यांनी आपले अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतले. तसेच प्रभाग १३ ड मधून सुरेश नारायण खरपुडे, प्रभाग १३ ब मधून अनिता कैलास खरपुडे आणि प्रभाग १६ क मधून संग्राम कोतकर यांनीही उमेदवारी माघारी घेतली आहे.
ऐनवेळी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काही ठिकाणी उमेदवारांना ‘शब्द’ देण्यात आल्याची, तर काही ठिकाणी आर्थिक घोडेबाजार झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे.
काल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन उमेदवार, तर आज भाजपचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याने नगर शहरात सध्या भाजप आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र अंतिम निकाल काय लागणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
येत्या १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार असून त्यावेळी अहिल्यानगर महानगरपालिकेचे नेमके राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या तरी नगरची खरी लढत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप यांच्यातच रंगताना दिसत आहे.
नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live com