नगर-पुणे महामार्गावरील चास घाट परिसरात दरोड्याची तयारी उधळून लावत स्थानिक गुन्हे शाखेने एका कुख्यात गुंडासह चार साथीदारांना जेरबंद केले. मध्यरात्रीनंतर पहाटे साडेतीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ७ लाख ९० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यात इनोव्हा चारचाकी, पिस्तूल, तलवार, जिवंत काडतुस, मोबाईल फोन व इतर साहित्याचा समावेश आहे.
जेरबंद आरोपींची नावे गौरव हरिभाऊ घायाळ (२४, सुपा, ता. पारनेर), सतिष बालासाहेब पावडे (३५), अनिकेत रमेश साळवे (२९), विशाल सुरेश जाधव (२३) आणि गोविंद बबनराव गाडे (३६) अशी आहेत. आरोपींना नगर-पुणे महामार्गावर दरोड्याची तयारी करत असताना पोलिसांनी वेढा घालून ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सपोनि हरिष भोये, उपनिरीक्षक अनंत सालगुडे, तसेच पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले, ह्रदय घोडके, दीपक घाटकर आदींच्या पथकाने संयुक्तपणे ही मोहीम राबवली.
घटनेनंतर आरोपींवर दरोडा तयारी, शस्त्र बाळगणे तसेच अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे.
नगर-पुणे महामार्गावर वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची ही कारवाई मोठी मानली जात असून स्थानिकांत दिलासा व्यक्त केला जात आहे.