📍अहिल्यानगर | ९ नोव्हेंबर
(प्रतिनिधी) –
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष) च्या वतीने अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्याची आढावा बैठक उत्साहात पार पडली. जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत आगामी निवडणुकांची रणनीती, बूथस्तरावरची संघटनवाढ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पक्षाची भूमिका ठरवण्यात आली.
या बैठकीचे अध्यक्षस्थान बाबासाहेब भोस यांनी भूषविले, तर प्रस्ताविक भाषण उत्तर जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांनी केले. बैठकीत जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर, प्रतापकाका ढाकणे, अरुण पाटील कडू, रावसाहेब म्हस्के, विजयसिंह गोलेकर, हरिदास शिर्के, शरद पवार, शिवशंकर राजळे, हरिष भारदे, रामेश्वर निमसे, योगिता राजळे, राजेश्वरी कोठावळे, अथर खान, अभिजित ससाणे यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत प्रत्येक तालुक्याच्या संघटनात्मक स्थितीचा आढावा घेण्यात आला. सर्व तालुकाध्यक्षांनी आपल्या भागातील तयारी व मतदारसंघातील संपर्क मोहीम यांचा अहवाल सादर केला. येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सर्व स्तरावर यश मिळवावे, यावर भर देण्यात आला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपवर हल्लाबोल
या बैठकीत भाषण करताना जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले,
“भाजप सरकारने शेतकऱ्यांची प्रचंड फसवणूक केली आहे. अतिवृष्टी, बाजारभावाचा अभाव आणि शेतमालाच्या दरातील घसरण यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होत आहेत. सरकारला शेतकऱ्यांचा नाही, तर मोजक्या उद्योगपतींचा फायदा महत्त्वाचा वाटतो.”
ते पुढे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शेतकऱ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरून लढेल. ही लढाई केवळ राजकीय नसून शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची आहे.”
संघटनवाढ आणि एकजुटीचा निर्धार
बैठकीचे अध्यक्ष बाबासाहेब भोस म्हणाले, “शरदचंद्र पवार साहेबांची विचारधारा म्हणजे संघर्ष, प्रामाणिकपणा आणि विकास. कार्यकर्त्यांनी ‘मीच राष्ट्रवादी’ ही भावना मनात ठेवून काम करावे.”
प्रतापकाका ढाकणे यांनी सांगितले की, “भाजपचे खोटे आश्वासन जनतेला आता पटत नाहीत. गावोगाव जाऊन शेतकऱ्यांशी, महिलांशी, युवकांशी थेट संवाद साधा — हीच पक्ष मजबूत करण्याची वेळ आहे.”
महिला, युवक, युवती, अल्पसंख्याक, आणि सामाजिक न्याय विभागाच्या प्रतिनिधींनीदेखील संघटनवाढ आणि मतदारसंघातील जनसंपर्क मोहिमेचा आराखडा सादर केला.

भाजपला जनतेचा रोष सहन करावा लागेल
जिल्हाध्यक्ष कळमकर यांनी पुढे सांगितले,“मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने मतचोरी आणि बाहेरील मते आणून सत्ता काबीज केली. पण यावेळी जनता सजग आहे. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी, बेरोजगार तरुणांसाठी आणि सामान्य जनतेसाठी राष्ट्रवादी लढा देईल. भाजपला जनतेच्या रोषाचा सामना करावा लागेल.”
नविन बातम्यांसाठी 👉 Ahilyanagar24live@gmail.com