अहिल्यानगर │ प्रतिनिधी
येऊ घातलेल्या अहिल्यानगर महानगर पालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली असून, त्यानंतर शहरातील राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली आहे. इच्छुक उमेदवारांनी तातडीने आपल्या प्रभागाचा नकाशा आणि छायाचित्रांसह पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात केली आहे.
प्रभाग रचनेत आमदार जगताप यांच्या समर्थकांचा भाग तुलनेने सेफ झोनमध्ये दिसत असला तरी विरोधकांच्या अनेक वॉर्डांची तोडफोड झाल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे, शिंदे गटालादेखील या नव्या रचनेचा फटका बसल्याचे जाणवते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून शिंदे सेनेला अडचणीत आणण्याची तयारी सुरू आहे का? अशी चर्चा शहरभर रंगत आहे.
दुसरीकडे, विरोधी ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट पुढील रणनीती काय आखणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र, सूत्रांच्या माहिती नुसार शहरात अनपेक्षित शहर विकास आघाडी होण्याची शक्यता आहे.त्यामुळे पुढील काळात नेमके काय घडणार याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.येणाऱ्या मनपा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी आणि पक्षांतर घडण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून, राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.