अहिल्यानगर | प्रतिनिधी
शहरात काल झालेल्या लाठीचार्ज प्रकरणानंतर पोलिसांनी कठोर पावले उचलली असून तब्बल 39 ओळखीच्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय 150 ते 200 अज्ञातांनाही आरोपी करण्यात आले आहे. सध्या 30 हून अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.
घटनेला सुरुवात रस्त्यावर काढलेल्या वादग्रस्त रांगोळी/ग्रॅफिटीमुळे झाली. या प्रकरणात रांगोळी काढणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर प्रथम गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तणाव वाढल्यानंतर संतप्त नागरिकांनी रास्तारोको केला आणि त्यात दगडफेक झाल्याने पोलिसांना अखेर लाठीचार्ज करावा लागला.
या प्रकरणी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्पष्ट केले की, आंदोलनकर्त्यांना शांततेने हटवण्याचा प्रयत्न झाला; परंतु परिस्थिती हाताबाहेर गेल्याने कारवाई करावी लागली. त्यांनी सांगितले की सध्या शहरातील स्थिती नियंत्रणात आहे व सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया देत “वैधानिक कारवाई नक्की होईल” असा विश्वास व्यक्त केला आहे. घटनेमुळे शहरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली असून पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.