पाथर्डी (प्रतिनिधी) –
पाथर्डी तालुक्यातील रुपनरवाडी परिसरातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असून तिला फुस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेचा तातडीने तपास करून मुलीचा शोध घ्यावा, या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष (दक्षिण) सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत तातडीने मुलीचा शोध घेण्याची मागणी केली. या प्रसंगी महेश भोसले, अतुल भिंगारदिवे, विलास गजभिव, कविता सोनवणे, संतोष शिरसाट, वंदना शिरसाट, कृष्णा गाडे, सुनीता शिंदे, नेहा जावळे, बेबीताई टकले, लक्ष्मण काळोखे, बाळासाहेब वाघमारे, रामदास माळी, उषा शिरसाट, लताबाई साळवे, दैवशाला माळी, सुशीला बर्डे, रेशमा चव्हाण, अमोल जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, दिनांक ५ जानेवारी रोजी सकाळी घराबाहेर गेलेली ही मुलगी पुन्हा परतली नाही. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र तिचा काहीही मागमूस लागला नाही. मोबाईलही बंद असल्याने ती अज्ञात ठिकाणी नेल्याची भीती कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतरही तत्काळ कारवाई न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे कुटुंबीय व समाजात तीव्र चिंता व्यक्त होत असून मुलीला सुरक्षित परत न आणल्यास याची जबाबदारी पोलिस प्रशासनावर राहील, असा इशारा रिपब्लिकन सेनेने दिला आहे.