कामगार-कष्टकऱ्यांचा स्वतंत्र राजकीय पर्याय उभा करण्यासाठी RWPI मैदानात

अहिल्यानगर |प्रतिनिधी 

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामगार-कष्टकऱ्यांचा स्वतंत्र राजकीय पर्याय उभा करण्यासाठी भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष (RWPI) सक्रिय झाला असून पक्षाचे उमेदवार कॉम्रेड अविनाश साठे यांच्या उमेदवारीच्या घोषणेसाठी नगर शहरात भव्य प्रचारफेरी काढण्यात आली.

ही प्रचारफेरी गवळीवाडा, सिद्धार्थनगर, म्युनिसिपल कॉलनी आणि बौद्धवस्ती या भागांतून काढण्यात आली. गवळीवाड्यापासून सुरू झालेल्या रॅलीला जोरदार घोषणांनी आणि कॉ. अविनाश साठे यांच्या प्रभावी भाषणाने उत्स्फूर्त सुरुवात झाली. परिसरातील कामगार, कष्टकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने या प्रचारफेरीत सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना कॉ. अविनाश साठे म्हणाले की, RWPI च्या नेतृत्वाखाली जनतेने ३५ वर्षे प्रलंबित असलेला पाणी प्रश्न सोडवला, डीपी मंजूर करून घेतली, ड्रेनेज लाईन, अंशत: कॉंक्रिटीकरणाची कामे करण्यात आली तसेच शेकडो विद्यार्थ्यांचे शालेय प्रवेश करून दिले गेले. या ठोस जनकार्यांच्या आधारावरच जनतेच्या पाठिंब्याने ही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या महानगरपालिका निवडणुकीत भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष हा कामगार-कष्टकऱ्यांचा स्वतंत्र राजकीय पर्याय म्हणून सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत कामगार-कष्टकरी जनतेने पर्याय नसल्याने विविध भांडवली पक्षांवर विश्वास ठेवला; मात्र त्यांच्या जीवनात कोणताही मूलभूत बदल झालेला नाही, असा आरोप त्यांनी केला.

भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे तसेच वंचित बहुजन आघाडी हे सर्व पक्ष भांडवलदार वर्गाच्या वेगवेगळ्या घटकांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे सत्ता कोणाच्याही हाती असली तरी धोरणे ही भांडवलदारांच्या हिताचीच ठरतात, असे परखड मत त्यांनी मांडले.

नगरमध्ये कॉ. अविनाश साठे यांच्या उमेदवारीसाठी काढण्यात आलेली भव्य प्रचारफेरी

कामगारांनी या भांडवली पक्षांचे वर्गचरित्र ओळखून मजबूत वर्गीय एकजूट उभी करावी आणि भांडवली राजकारण नाकारावे, असे आवाहनही त्यांनी केले. जनतेच्या सहमतीने व पाठिंब्यानेच आपण निवडणुकीच्या मैदानात उतरलो असून कामगार-कष्टकऱ्यांचे जनहिताचे, क्रांतिकारी राजकारण उभे करत असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रचारफेरीत मोठ्या संख्येने कामगार-कष्टकरी जनता सहभागी झाली होती. रॅलीचा समारोप पंचशील शाळेजवळ करण्यात आला.

 

 

नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!