(Ahilyanagar24Live – दिवाळी 2025 विशेष बातमी)
अहिल्यानगर (प्रतिनिधी) –
सोमवारी (दि. 20 ऑक्टोबर) अहिल्यानगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी दिवाळीचा पहिला दिवा अर्पण करून दिवाळी उत्सवाची तेजोमय सुरुवात झाली. मराठा सेवा संघ, मराठा समन्वय परिषद आणि जिजाऊ ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील जुने बसस्थानक परिसरात महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याभोवती दीपोत्सव आयोजित करण्यात आला.
लखलखत्या पणत्यांनी उजळलेल्या पुतळ्याभोवती “जय भवानी, जय शिवाजी!, जय जिजाऊ, जय शिवराय!, जय शंभूराजे!” अशा जयघोषाने परिसर गजरला. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने शिवप्रेमी, महिला, युवक-युवती सहभागी झाले आणि महाराजांना दीपांजली वाहिली.
कार्यक्रमास मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा ॲड. स्वाती जाधव, अलकाताई मुंदडा, ॲड. अनुराधा येवले, तसेच अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती लावलेल्या प्रकाशाने परिसर उजळून निघाला आणि जयजयकाराच्या निनादात दिवाळीचा आनंद द्विगुणीत झाला.
अनिता काळे म्हणाल्या, “दिवाळी हा फक्त बळीराजाचा उत्सव नाही, तर आपण आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनाही दीप अर्पण करून खरी दिवाळी साजरी करीत आहोत. हा दीपोत्सव म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा उत्सव आहे.”
सुरेश इथापे म्हणाले, “शिवाजी महाराजांच्या तेजोमय कार्याला साक्ष देणारा हा दीपोत्सव स्वराज्याच्या स्मृतींना उजाळा देणारा सोहळा आहे. लखलखत्या पणत्यांच्या झगमगाटात अर्पण झालेला पहिला दिवा म्हणजे स्वराज्याचा, संस्कृतीचा आणि अभिमानाचा दीप आहे.”