मुंबई |प्रतिनिधी
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना शिवसेना-मनसे युतीची चर्चा चांगलीच रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने मनसेला 70 जागा देण्याची प्राथमिक तयारी दाखवली असून स्वतःकडे 157 जागा ठेवण्याचा फॉर्म्युला सुचवला आहे.
मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये मनसेला प्रत्येकी दोन जागा देण्याची तयारी असल्याचंही सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे वरळी, दादर-माहीम, शिवडी आणि भांडुप या मतदारसंघांमध्ये मनसेनं 3 जागांची मागणी केली असल्याची माहिती समोर आली आहे.
या संपूर्ण चर्चेबाबत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट भाष्य करण्यास नकार दिला. “अजून युतीची घोषणाच झालेली नाही. घोषणेनंतरच जागावाटपाचा निर्णय होईल,” असे त्यांनी सांगितले. तर सचिन अहिर यांनी, “युती करायची असल्यास काही त्याग करावे लागतात,” असे मत व्यक्त केले.
आता राज ठाकरे शिवसेनेचा प्रस्ताव मान्य करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. युती झाली तर मुंबईतील राजकीय गणित बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com