अहिल्यानगर (प्रतिनिधी) –
भिंगार, भुईकोट किल्ला परिसरातील श्री बेलेश्वर महादेव मंदिर येथे सोमवारी (दि. १३ ऑक्टोबर) भगवान शंकरांना चांदीचा मुकुट अर्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. चांदीचा मुकुट सोहळा या देवस्थानात पहिल्यांदाच होत असल्याने परिसरातील श्रद्धाळूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
या चांदीचा मुकुट सोहळा कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ६ वाजता स्टेट बँक चौकातून निघणाऱ्या भव्य मिरवणुकीने होणार आहे. मिरवणुकीत पारंपरिक वाद्य, ढोल-ताशे आणि भक्तांच्या जयघोषाने वातावरण दुमदुमणार आहे. रात्री ८ वाजता श्री बेलेश्वर महादेवांना चांदीचा मुकुट अर्पण करून विशेष महाआरती केली जाणार आहे. त्यानंतर उपस्थित भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी सर्व श्रद्धाळूंनी उपस्थित राहावे, असे आवाहन या सोहळ्याचे संयोजक लक्ष्मण (आबा) कचरे, संतोष कानडे, गणेश लालबागे, वृषभ कोठारी आणि संदीप गुजर यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री बेलेश्वर आरती ग्रुप आणि आदिशक्ती सार्वजनिक मित्र मंडळ प्रयत्नशील आहेत.