अहिल्यानगर | प्रतिनिधी
श्रीरामपूर शहरात मातंग समाजातील तिघा युवकांवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला झाल्याच्या निषेधार्थ सकल मातंग समाजाच्या वतीने आज पोलीस अधीक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून हल्लेखोर सराईत गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची ठाम मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, समाजातील युवक साई साळवे, रुद्र जगधने व भोलू गुप्ता यांच्यावर मुस्लिम समाजातील साहिल सय्यद व शाहिद सय्यद या सराईत गुंडांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात तिघेही युवक गंभीर जखमी होऊन रुग्णालयात दाखल असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
समाजबांधवांनी यापूर्वीच या गुंडांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र श्रीरामपूर पोलिसांनी ठोस कारवाई केली नसल्याने आरोपींचा धीर वाढला आणि त्यांनी मोठा गुन्हा केला, असा आरोप मोर्चातून करण्यात आला.
या मोर्चात अंकुश मोहिते, सुनील उमाप, चंद्रकांत काळाखे, नामदेव चांदणे, संजय चांदणे, जय भोसले, पप्पू पाटील, राम वडागळे, राम काते, पोपटराव पाथरे, प्रकाश वाघमारे, दीपक पाचारणे, लहु खंडागळे, सनी लोखंडे, सुनील सकट, आकाश भोसले, अशोक भोसले, यशोदास वाघमारे, सागर साठे, नितीन खंडारे, दीपक सरोदे, हिना उबाळे, विलास ससाने, सागर उबाळे, रोहित जोशी, स्वप्निल साळवे, सुनील ढोले, राहुल ठोकळ यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते.