मुंबई | प्रतिनिधी
राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (५ ऑक्टोबर) झालेली भेट राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल देणारी ठरत आहे. संजय राऊत यांच्या घरी झालेल्या कौटुंबिक कार्यक्रमानंतर राज ठाकरे थेट ‘मातोश्री’वर पोहोचले, जिथे दोघांमध्ये सुमारे अर्धा तास बंद दरवाजामागे चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशाचा कार्यक्रम हा या भेटीचा निमित्त ठरला. या समारंभाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही एकाचवेळी उपस्थित राहिले. या प्रसंगी दोघांमधील संवाद, परस्पर शुभेच्छा आणि सौहार्द पाहून उपस्थितांनीही कौतुक व्यक्त केले. मात्र कार्यक्रमानंतर राज ठाकरे थेट बांद्र्यातील ‘मातोश्री’ येथे गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.
संध्याकाळी झालेल्या या भेटीत कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितले गेलेले नाही. मात्र सूत्रांचे म्हणणे आहे की, मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका आणि राजकीय सहकार्याची शक्यता यावर प्राथमिक चर्चा झाली असावी. गेल्या काही महिन्यांत ठाकरे बंधूंच्या अशा अनेक अनौपचारिक भेटी झाल्या असून, गेल्या तीन महिन्यांत ही दुसरी वेळ आहे की राज ठाकरे ‘मातोश्री’वर पोहोचले आहेत.
या भेटीबद्दल संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातला संवाद चांगला सुरू आहे. दोघेही एकमेकांना समजून घेणारे आहेत. निर्णय कधी आणि कसा घ्यायचा, हे ते स्वतः ठरवतील.” त्यांच्या या विधानानेही आगामी काळात ‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’ऐवजी ‘ठाकरे एकत्र’ अशी शक्यता राजकीय चर्चेत पुढे आली आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, उद्धव ठाकरे गट आणि मनसे युती झाली, तर भाजप-शिंदे गटाला मोठे आव्हान उभे राहू शकते. विशेषतः मुंबई आणि ठाणे परिसरात ठाकरे बंधूंचा प्रभाव लक्षात घेता या दोघांच्या जवळिकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र अद्याप कोणताही ठोस राजकीय निर्णय घेण्यात आलेला नसल्याने या भेटीला राजकीय संवादाची नवी सुरुवात असेच स्वरूप दिले जात आहे.