विजेच्या लपंडावामुळे केडगावमध्ये पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न;मनोज कोतकर यांचे महावितरणला निवेदन

अहिल्यानगर | प्रतिनिधी

सणासुदीच्या काळात केडगाव उपनगरात विजेच्या लपंडावामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दिवाळीसारख्या प्रकाशोत्सवाच्या काळात पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी महावितरण कार्यालयावर जोरदार टीका करत, तातडीने विजेचा आणि पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे.

महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना न देता वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने, मुळा धरण, विळद आणि नागपूर येथील वितरण व्यवस्थेवर परिणाम होत आहे. काही मिनिटांची वीजबंदी झाल्यास पाणीपुरवठा दोन ते चार दिवस पुढे ढकलला जातो, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

यामुळे बाजारपेठेतील व्यापारी, सर्वसामान्य नागरिक तसेच विद्यार्थी वर्ग अडचणीत सापडला आहे. दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात पाण्याची कमतरता झाल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे.

मनोज कोतकर यांनी महावितरणच्या शहर उपअभियंता चव्हाण यांना निवेदन देत म्हटले, “देखभाल आणि दुरुस्तीच्या नावाखाली भारनियमन करणे योग्य नाही. दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे आणि या काळात विजेचा पुरवठा खंडित करणे म्हणजे नागरिकांच्या आनंदात व्यत्यय आणणे आहे.”

निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, केडगावसारख्या मोठ्या उपनगरात वारंवार वीजपुरवठा खंडित होणे आणि पाणीटंचाई निर्माण होणे हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे द्योतक आहे. नागरिकांनी महावितरणला जबाबदार धरत, स्थिर वीजपुरवठा राखावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!