अहिल्यानगर | दिनांक 31 डिसेंबर 2025
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी संपल्यानंतर आजपासून अर्ज छाननी प्रक्रियेला सुरुवात झाली. विविध प्रभागांमध्ये उमेदवारांनी एकमेकांविरोधात हरकती दाखल केल्याने काही ठिकाणी छाननी प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू असल्याचे चित्र दिसून आले. काही प्रभागांमध्ये एबी फॉर्मवरील त्रुटी तसेच तांत्रिक कारणांमुळे उमेदवार अडचणीत आल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, प्रभाग क्रमांक ८ मधील अर्ज छाननी पूर्ण झाल्यानंतर वैध उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. या प्रभागातील ड – सर्वसाधारण प्रवर्गात आता केवळ दोनच उमेदवार रिंगणात राहिले असून, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कुमार बबनराव वाकळे आणि अपक्ष उमेदवार कोलते मुरलीधर रामा यांची नावे वैध ठरली आहेत.
शिवसेना (शिंदे गट) कडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले राहुल कातोरे यांचे नाव वैध उमेदवारांच्या यादीत नसल्याने या प्रभागात आता थेट दोन उमेदवारांमध्येच लढत होणार आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ८ मध्ये वाकळे विरुद्ध कोलते अशी सरळ निवडणूक रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, शहरातील इतर प्रभागांमध्येही अर्ज छाननीची प्रक्रिया सुरू असून, अनेक ठिकाणी हरकतींवर सुनावणी झाली आहे. काही प्रकरणांमध्ये निर्णय रखडले असून, उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम तारखेनंतर निवडणूक चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.
नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com