चांदा शाळेचे क्रीडांगण रखडले; ग्रामस्थांमध्ये संताप

नेवासा | प्रतिनिधी 

चांदा येथील जवाहर विद्यालय शाळेच्या क्रीडांगण व खेळ सुविधांबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नसल्याने विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्रीडा हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप ग्रामस्थ आणि पालकांकडून करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीचा ठराव, शाळेची मागणी आणि पालकांच्या वारंवार तक्रारी असूनही संबंधित विभागाकडून केवळ आश्वासनांचीच सरबत्ती होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

शासन नियमानुसार प्रत्येक शाळेला क्रीडांगण व आवश्यक खेळ सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. मात्र चांदा येथील जवाहर विद्यालय शाळेत प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी योग्य जागा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. याबाबत ग्रामपंचायतीकडून ठराव मंजूर करून संबंधित विभागांना लेखी कळविण्यात आले आहे.

दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांना सविस्तर ई-मेलसह छायाचित्र पुरावे पाठविण्यात आले. तरीदेखील अद्याप प्रत्यक्ष पाहणी (Inspection) किंवा अधिकृत निर्णयाची नोंद झालेली नाही.

खेळासाठी जागा नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास, क्रीडा स्पर्धांमधील सहभाग आणि शालेय गुणवत्ता यावर गंभीर परिणाम होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. “फाईल पुढे पाठवली आहे”, “विचाराधीन आहे” अशी कारणे देत प्रशासन वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

७ दिवसांची अंतिम मुदत

या संदर्भात संबंधित प्रशासनाला पुढील ७ दिवसांत प्रत्यक्ष पाहणी करून लेखी निर्णय जाहीर करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. निर्धारित कालावधीत कोणतीही ठोस कारवाई न झाल्यास विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी माननीय उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा नागरिकांनी दिला आहे.

 

नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!