अहिल्यानगर | १६ मार्च
अहिल्यानगर शहरातील सुमारे ४०० वर्षांचा इतिहास लाभलेली माळीवाडा वेस पाडण्याचा काही समाजकंटकांकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप करत या ऐतिहासिक वास्तूचे संरक्षण करण्याची मागणी माळीवाडा वेस बचाव समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माळीवाडा वेस ही शहराच्या इतिहासाची साक्ष देणारी आणि अहिल्यानगरच्या ओळखीचा महत्त्वाचा भाग असलेली वास्तू आहे. ही वेस शहराच्या जडणघडणीची साक्ष देत असून शहराचे प्रवेशद्वार म्हणूनही तिचे ऐतिहासिक महत्त्व आहे. अशा ऐतिहासिक वास्तूचे जतन न झाल्यास शहराचा वारसा धोक्यात येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पुरातत्त्व विभागाने यापूर्वी १९७६ तसेच २०२२ साली या वेशीचे संरक्षण करण्याचे निर्देश दिले होते. तसेच कोणत्याही प्रकारे ही ऐतिहासिक रचना नष्ट करू नये, असे आदेश तत्कालीन न्यायपालिकेनेही दिले होते. माळीवाडा वेस सुमारे १६३२ साली बांधण्यात आल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे.
दरम्यान, ही वेस पाडण्याबाबत काही समाजकंटकांकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप समितीने केला आहे. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूला पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.

यापूर्वी माळीवाडा वेस पाडण्याबाबत नागरिकांनी हरकती घेतल्या होत्या. ११ डिसेंबर २०२४ रोजी ही मागणी आयुक्तांकडे करण्यात आली होती. त्यानंतर नागरिकांचा रोष लक्षात घेऊन १३ डिसेंबर २०२४ रोजी आयुक्तांनी स्वतः जाहीर पत्रक काढून वेस निष्कासित करण्याचा निर्णय रद्द केला होता.
तरीदेखील काही समाजकंटकांकडून माळीवाडा वेस पाडण्याबाबत वक्तव्ये केली जात असल्याने अशा व्यक्तींवर कलम ३५२, ३५३, १६ बी.एन.एस. २०२३ नुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी संभाजी कदम, अनिल शिंदे, दत्तात्रय कावरे, अनिल लोखंडे , परेश लोखंडे, भैरवनाथ वाकळे, भूषण देशमुख,नितीन भुतारे ,पंकज मेहेर तसेच इतिहास प्रेमी सह इतर कार्यकर्ते उपस्थित
होते.
नविन बातम्यांसाठी 👉 http://ahilyanagar24live.com