अहिल्यानगर | 14 मार्च 2026
नगर तालुक्यातील खारेकर्जुने ग्रामपंचायत हद्दीतील चोंडी येथील नवबौध्द दलित वस्तीच्या रस्त्याच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब एकनाथ ढवळे यांनी केला आहे. रस्ता पूर्णपणे दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाल्याशिवाय त्याचे बील अदा करू नये, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
चोंडी येथील नवबौध्द दलित वस्तीला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे नागरिकांना अनेक वर्षांपासून मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. विशेषतः पावसाळ्यात लहान मुलांना शाळेत जाताना मोठे हाल सहन करावे लागत होते. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी बाळासाहेब ढवळे यांनी 5 जून 2025 रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन छायाचित्रांसह नागरिकांच्या अडचणींबाबत निवेदन दिले होते.

या रस्त्याच्या कामासाठी माजी आमदार स्व. अनिल राठोड तसेच आमदार स्व. शिवाजीराव कर्डिले यांनी विशेष प्रयत्न केले होते. मात्र काही शेतकऱ्यांनी वेळोवेळी अडथळे निर्माण केल्यामुळे हे काम अनेक वर्षे प्रलंबित राहिले. संबंधित जमीन ही महाराष्ट्र शासनाच्या मालकीची असून काही व्यक्तींनी त्या जमिनीवर परस्पर नावे लावून शासनाची फसवणूक केल्याचा मुद्दाही ढवळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला होता.
जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत चोंडी वस्ती रस्त्यासाठी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 27 ऑक्टोबर 2025 रोजी या कामासाठी निविदा काढण्यात आल्या. मात्र हे काम नेमक्या कोणत्या संस्थेला देण्यात आले आहे याची माहिती कामाच्या ठिकाणी उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे. कामाच्या ठिकाणी एजन्सीचा अधिकृत बोर्ड लावलेला नसून केवळ काही राजकीय नेत्यांचे फोटो लावलेले असल्याची बाब समोर आली आहे.
ढवळे यांनी आरोप केला की, संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले असून अंदाजे 10 लाख रुपयांच्या निधीतून केवळ साडेतीन लाख रुपयांपर्यंतच काम केल्याचा संशय आहे. कामाच्या ठिकाणी अंदाजपत्रक, कामाचा तपशील किंवा एजन्सीचा बोर्ड नसल्यामुळे या कामात अनियमितता झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
तसेच ठेकेदाराने परस्पर राजकीय नेत्यांचे फोटो लावल्यामुळे नागरिकांमध्ये संबंधित नेत्यांविषयी नाराजी निर्माण होत असल्याचेही ढवळे यांनी नमूद केले. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या नावाचा आणि फोटोचा दुरुपयोग केल्याबद्दल संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, या रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावे अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या प्रकरणाची पालकमंत्र्यांनी दखल घेऊन चौकशी समिती नेमावी, संबंधित अभियंता व ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी आणि रस्ता पूर्णपणे समाधानकारक झाल्याशिवाय कोणतेही बील अदा करू नये, अशी मागणी बाळासाहेब ढवळे यांनी केली आहे.
नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com