नवी दिल्ली | 4 एप्रिल 2026
जागतिक स्तरावर वाढत्या युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने आपली संरक्षण तयारी अधिक मजबूत करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय हवाई दलासाठी 1000 किलो वजनाचे सुमारे 600 ‘मेड इन इंडिया’ एरियल बॉम्ब खरेदी करण्याची प्रक्रिया संरक्षण मंत्रालयाने सुरू केली आहे.
हे बॉम्ब अत्याधुनिक आणि उच्च क्षमतेचे असणार असून ते स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकतात. सध्या या प्रकारच्या बॉम्बसाठी भारताला परदेशी कंपन्यांवर अवलंबून राहावे लागत होते, मात्र आता स्वदेशी उत्पादनावर भर देण्यात येत आहे. या निर्णयामुळे देशाच्या संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेला मोठी चालना मिळणार आहे.
या प्रकल्पात बॉम्बसोबत टेल युनिट आणि आवश्यक तांत्रिक उपकरणांचाही समावेश असेल. विशेष म्हणजे हे बॉम्ब भारतीय हवाई दलातील रशियन आणि पाश्चात्य बनावटीच्या लढाऊ विमानांमधून सहजपणे वापरता येतील.
ही संपूर्ण प्रक्रिया दोन टप्प्यांत राबवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सहा प्रोटोटाइप तयार करून त्यांची चाचणी घेतली जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अंतिम खरेदी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. या प्रकल्पाची एकूण कालमर्यादा सुमारे अडीच वर्षे ठेवण्यात आली आहे.
या प्रकल्पात किमान 50 टक्के स्वदेशी सामग्रीचा वापर बंधनकारक ठेवण्यात आला आहे. तसेच भारतीय खासगी कंपन्यांनाही या प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे. गरज पडल्यास परदेशी तंत्रज्ञान सहकार्यालाही परवानगी असेल, मात्र स्वदेशी उत्पादनाला प्राधान्य दिले जाणार आहे.
महत्त्वाचे मुद्दे :
1000 किलोचे 600 एरियल बॉम्ब खरेदी प्रक्रिया सुरू
‘बाय इंडियन’ श्रेणीअंतर्गत प्रकल्प राबवणार
50% स्वदेशी सामग्री बंधनकारक
प्रकल्प कालावधी: सुमारे 2.5 वर्षे
भारतीय वायुसेनेच्या विविध विमानांमधून वापर शक्य
नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com