(IPL)आरसीबीचा ऐतिहासिक विजय! चेन्नईचा ४३ धावांनी धुव्वा.

बंगळुरू | ६ एप्रिल २०२६

(IPL)आयपीएल २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने दमदार कामगिरी करत चेन्नई सुपर किंग्सवर ४३ धावांनी मोठा विजय मिळवला. बेंगळूरच्या एम. चिन्नस्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीच्या फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी करत चेन्नईसमोर तब्बल २५१ धावांचे आव्हान उभे केले.

आरसीबीकडून सुरुवात विराट कोहली (२८) आणि फिल साल्ट (४६) यांनी आक्रमक केली. त्यानंतर देवदत्त पडिक्कलने अर्धशतक झळकावत डाव सावरला. मात्र, खरा रंग चढला तो टिम डेव्हिडच्या वादळी खेळीमुळे. डेव्हिडने अवघ्या २५ चेंडूत नाबाद ७० धावा करत ८ षटकारांचा पाऊस पाडला. त्याला रजत पाटीदारने (नाबाद ४८) उत्कृष्ट साथ दिली. या फटकेबाजीमुळे आरसीबीने २० षटकांत ३ बाद २५० धावांचा प्रचंड डोंगर उभारला.

२५१ धावांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवातच डळमळीत झाली. कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन स्वस्तात माघारी परतले. सर्फराज खानने ५० धावांची झुंजार खेळी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र वाढत्या धावसंख्येच्या दडपणामुळे संपूर्ण संघ १९.४ षटकांत २०७ धावांवर बाद झाला.

आरसीबीकडून भुवनेश्वर कुमारने ३ बळी घेत प्रभावी गोलंदाजी केली, तर जॅकब डफी आणि क्रुणाल पंड्या यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

अष्टपैलू कामगिरीसाठी टिम डेव्हिडला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयामुळे आरसीबीने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले असून, चेन्नईचा या हंगामातील सलग तिसरा पराभव ठरला आहे.

 

नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!