मुंबई | 15 मार्च 2026
महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने या दोन्ही मतदारसंघांसाठी संपूर्ण निवडणूक वेळापत्रक जाहीर केले असून 23 एप्रिल रोजी मतदान तर 4 मे रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे. या घोषणेमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचाली वाढल्या आहेत.
बारामती विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे जागा रिक्त झाली होती. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याची वेळ आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देत उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. त्यामुळे त्यांना सहा महिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सदस्य होणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सुनेत्रा पवार या बारामती पोटनिवडणुकीच्या उमेदवार असतील, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे बारामतीतील ही निवडणूक बिनविरोध होण्याचीही शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांच्या निधनामुळे जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघातही पोटनिवडणूक होत आहे. भाजपकडून या मतदारसंघात कोणाला उमेदवारी दिली जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजकीय चर्चेनुसार बारामतीप्रमाणेच राहुरी मतदारसंघातील निवडणूकही बिनविरोध करण्याचा प्रयत्न काही पक्षांकडून केला जाऊ शकतो. मात्र याबाबत अद्याप अधिकृत निर्णय झालेला नाही.
महत्त्वाच्या तारखा
• निवडणुकीची घोषणा – 15 मार्च 2026
• मतदान – 23 एप्रिल 2026
• मतमोजणी – 4 मे 2026
नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com