‘आजारी’ असल्याचे नाटक करून आरोपी रुग्णालयात मजेत? सामाजिक कार्यकर्त्यांचा गंभीर दावा

अहिल्यानगर | २४ मे २०२६

जिल्हा कारागृहातील गंभीर गुन्ह्यांतील काही आरोपी खोटे आजारी असल्याचे भासवून जिल्हा शासकीय रुग्णालयातील कैदी वॉर्डमध्ये अवैध सुविधा घेत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते सुधीर भद्रे यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सुधीर भद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही आरोपी प्रत्यक्षात पूर्णपणे ठणठणीत असतानाही आजारपणाचा बहाणा करून कारागृहातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संगनमत साधत आहेत. त्यानंतर उपचाराच्या नावाखाली त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले जाते. तेथे आरोपींकडून मोबाईल फोनचा वापर, बाहेरील व्यक्तींशी संपर्क, अनधिकृत भेटीगाठी तसेच जामिनासाठी हालचाली केल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकारात काही कारागृह कर्मचारी, पोलीस अधिकारी तसेच जिल्हा रुग्णालयातील काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याची शंका देखील व्यक्त करण्यात आली आहे. गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना अशा प्रकारच्या सुविधा मिळाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच आरोपींकडून साक्षीदारांवर दबाव आणणे, पुराव्यांमध्ये फेरफार करणे किंवा गुन्हेगारी कारवाया सुरू ठेवण्याची शक्यता वाढत असल्याचेही भद्रे यांनी नमूद केले.

विशेष म्हणजे, १० जून २०२५ रोजी पोलिस उपअधीक्षकांच्या खुनाच्या प्रयत्न प्रकरणातील एका आरोपी पोलिस अधिकाऱ्याने जिल्हा रुग्णालयातून पलायन केल्याची घटना घडली होती. संबंधित आरोपी अद्याप फरार असल्याचा उल्लेख करत या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

भद्रे यांच्या प्रमुख मागण्या

कैद्यांची वैद्यकीय तपासणी कडक आणि निष्पक्ष पद्धतीने करावी

किरकोळ आजार असल्यास आरोपींना त्याच दिवशी पुन्हा कारागृहात पाठवावे

गंभीर आजार असल्यास आरोपींना ससून रुग्णालय, पुणे येथे हलविण्याचे धोरण ठरवावे

कैदी वॉर्डमध्ये उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत

मोबाईल वापर, अनधिकृत भेटी आणि विशेष सुविधा पूर्णपणे बंद कराव्यात

सर्व भेटींची नोंद अनिवार्य करून स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था ठेवावी

दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी

भद्रे यांनी या मागण्यांच्या प्रती राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, राज्य मानवी हक्क आयोग, प्रधान जिल्हा न्यायाधीश, मुख्य न्यायदंडाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा कारागृह अधीक्षक यांनाही पाठविल्या आहेत.

 

नविन बातम्यांसाठी 👉http://Ahilyanagar24live.com

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!